Sunday, April 28, 2013

चला आज बाहुलीसाठी नवा फ्रॉक विणूयात







१० साखळ्या घाला. 
बाहुलीच्या गळ्याला त्या गुंडाळून बघा. जर पुरात असेल तर छानच. जर पुरात नसेल तर अजून काही साखळ्या घाला. पुन्हा बघा. बाहुलीच्या गळ्याला सैल सर् बसेल एव्हढ्या साखळ्या हव्यात.




ओळ १ : प्रत्येक साखळीत मुका खांब घाला. 



ओळ २ : प्रत्येक खांबात २ मुके खांब घाला. 

ओळ  ३ : प्रत्येक खांबात २ मुके खांब घाला. 
तुमच्या बाहुलीला हे घालून बघा. तिच्या बगळे पर्यंत येते आहे का? जर येत असेल तर पुढचे करा. जर येत नसेल तर तिसरी ओळ पुन्हा करा आणि लावून बघा. बहुदा पुरेल. पण अजून लागली तर पुन्हा करा ती ओळ. 


आता  तुमचे एकूण खांब मोजा. 
जी  संख्या येईल त्याला ८ ने भागा. उदा जर तुमचे ४० खांब असतील तर ४०/८=५ 
आता ५ । ५+५ । ५+५ | ५+५ । ५ = ४० अशी विभागणी करा. 
यातले पहिले ५ । मधले ५+५ । आणि शेवटचे ५  फक्त हेच खांब खालील प्रमाणे विणायाचे.

ओळ  ४ :  
पहिल्या ३ साखळ्या घाला, खालचा १ खांब सोडून पुढच्या खांबात खांब घाला,  १ साखळी, जिथे आधीचा खांब घातलात तेथेच पुन्हा अर्धा खांब ( तीनाचे दोन फक्त) घाला, खालचा १ खांब सोडून पुढच्या खांबात खांब घाला, आधीचा अर्धाही पूर्ण करा,

१ साखळी, जिथे आधीचा खांब घातलात तेथेच पुन्हा अर्धा खांब ( तीनाचे दोन फक्त) घाला, पुढच्या खांबात खांब घाला, आधीचा अर्धाही पूर्ण करा, .... से शेवट पर्यंत विणा, शेवटी १ साखळी, १ खांब. 




ओळ ५ :
३ साखळ्या विणा, पुढच्या जाळीत खांब विणा, १ साखळी, पुन्हा तेथेच अर्धा खांब विणा, पुढच्या जाळीत खांब विणा, आधीचा अर्धाही पूर्ण करा, १ साखळी,

पुन्हा तेथेच अर्धा खांब विणा, पुढच्या जाळीत खांब विणा, आधीचा अर्धाही पूर्ण करा, १ साखळी,... असे विणा. 


ओळ ५ प्रमाणे तुम्हाला हव्या त्या उंची पर्यंत विणा.




शेवटची ओळ : ३ साखळ्या, त्याच जाळीत १ खांब, २ साखळ्या, त्याच जाळीत २ खांब, खालची एक जाळी सोडून पुढच्या जाळीत २ खांब, २ साखळ्या, २ खांब, खालची एक जाळी सोडून पुढच्या जाळीत २ खांब, २ साखळ्या, २ खांब, ... असे शेवट पर्यंत विणा. शेवटी टाक्यातून दोरा काढून बंद करा.




आता नव्या २० साखळ्या विणा. दोरा टाक्यातून काढून ठेऊन जरा लांब ठेऊन तोडा. 

अशा २० -२० साखळ्यां च्या एकूण ४ पट्ट्या करून घ्या.



आता या पट्ट्या फ्रोकाच्या गळ्याशी दोन बाजूंना २ आणि कमरेशी दोन बाजूंना दोन गाठी मारून बांधा. जास्ती दोरा ठेवला आहे तेथून गाठी मारा. 




आता फ्रॉक बाहुलीला घाला. मागून गळ्याला आणि कमरेला दोन्ही पट्ट्यांना बुटाची लेस बांधतो तसे बांधा. 


तयार झाला बाहुलीचा फ्रॉक  !




बघा बाहुली कशी दिसतेय? मला फोटो पाठवा बरं का तुमच्या बाहुलीचे :)


आणि हो थोडे काही चुकले तर घाबरू नका. पुढचे करा. थोडे चुकले तरी बाहुली काही रागवायची नाही बरं का तुम्हाला ;)



Saturday, April 27, 2013

क्रोशाच्या सुईने साखळी विणणे.


चला  आज आपण क्रोशा शिकुयात. घाबरू नका एकदम सोपे आहे. छोट्या - छोट्या गोष्टी शिकुयात इथे.
पहिल्यांदा क्रोशाची सुई दिसते कशी ते पाहुयात.

क्रोशाची सुई
 क्रोशाच्या सुईकडे नीट पहा. चित्रात बाण दाखवला आहे तिथे एका बाजूला तिला बाक आहे. या बाकमुळे सुईत  दोरा छान अडकू शकतो. याचाच फायदा आपल्याला क्रोशा विणकामात होतो.




आता या सुईने आपण लोकरीच्या धाग्याने काही गमती जमाती करूयात. सर्वात आधी साखळी शिकुयात. या साखळी वरती नंतर आपण गमती जमती करूयात.

  साखळी

आपण आता पहिला टाका कसा तयार करायचा शिकुयात.

१.दो-याचा गुंडा डावीकडे ठेवा. दो-याची सुरूवातीचे टोक उजव्या हातात घ्या. डाव्या हाताच्या बोटाभोवती या दो-याचे दोन वेढे घाला. आता सुरुवातीचे टोक सोडून द्या.
२.डाव्या हाताच्या बोटावरच्या दोन वेढ्यांपैकी डावीकडचा वेढा थोडा ओढून उजवीकडच्या वेढ्यावरून पलीकडे न्या.
३.आता पुन्हा डावीकडचा वेढा थोडा ओढून उजवीकडच्या वेढ्याच्या वरून पलीकडे न्या.
४. बोटावरून खाली काढून टाका.
५.आता खाली आलेली दोन्ही दो-याची टोके ( सुरुवातीचे टोक अन गुंड्याला सलग्न असलेले टोक) थोडे ओढून बोटाखालची गाठ घट्ट करा.
६. आता हलकेच बोटावरचा वेढा काढून घ्या. ही आपली पहिली साखळी. त्यात क्रोशाची सुई घाला. गुंड्याला सलग्न दोरा ओढून टाका सुईवर घट्ट करा. सुई व त्यातली साखळी नीट बाजूला ठेवा.









 
आता गुंड्यातून दोन अडिच फूट दोरा सोडवून घ्या. "गुंड्याच्या बाजूने सुईत अडकलेल्या दो-याकडे" हा दोरा डाव्या हाताच्या तर्जनीवर गुंडाळा. हे गुंडाळताना फार घट्ट गुंडाळू नका, नाहीतर बोट काळे निळे होईल. तसेच फार सैलही गुंडाळू नका, नाहीतर हे गुंडाळलेले वारंवार सुटेल. सवयीने किती घट्ट किती सैल याचा अंदाज येतो.
उजव्या हातात पेन धरतो तशी सुई धरा. डाव्या बोटावर दोरा इतका गुंडाळा की ज्यान्वये सुईतील टाका आणि हे बोट यांच्यात साधारण २ इंच अंतर राहील.
आता उजव्या हातात सुई पेन धरतो तशी धरा. डावा अंगठा आणि मधले बोट यात सुईतल्या साखळी खालचा धागा धरा. आता सुईचे टोक अंगठा आणि दोरा याच्या मध्ये न्या. (दोरा सुई खाली असला पाहिजे.) आता डाव्या बोटाच्या तर्जनीला थोडे सैल करा आणि सुईचे टोक  दो-याखालून उजवीकडे वळवून थोडे वरच्या दिशेला तोंड करून न्या. आता डाव्या हाताची तर्जनी जरा ताणून हळुहळू सुई मागे घ्या. आता लक्षात येईल की नवा धागा सुईवर आला आहे, आणि तो सुईला जो बाक आहे त्यात अडकतो आहे.
आता अशीच सुई अजून मागे घ्या आता सुईवरच्या पहिल्या साखळीतून हा नवा अडकलेला धागा ओढून घ्या. हवे तेव्हढे डावी तर्जनी सैल ठेवा. हळुच हा सुईत अडकलेला धाका पहिल्या साखळीतून बाहेर काढून घ्या. आता पहिली साखळी खाली. अन त्यातून वर आलेली दुसरी साखळी सुईवर आलेली दिसेल.
मदतीसाठी व्हिडीओ ( आवाजासह ) पहा.




कागदाचा उद्या मारणारा बेडूकमामा

कृती  :
यासाठी सलग दोन चौकोन लागतात. मोठ्या कागदाला आधी मध्यात घडी घाला. आता त्यातून सलग  चौकोन मिळवण्यासाठी तिरकी घडी घाला. अनावश्यक कागद काढून टाका.
आता कागद पूर्ण उघडा. दोन्ही चौकोनात तिरक्या घड्या घाला. कागद उलटवा. दोन्ही चौकोनात आडव्या घड्या घाला.
पुन्हा कागद उलटा करा आता घड्याम्चा उपयोग करत दोन्ही काउकोनाम्च्या त्रिकोणी घड्या करा.
यातील चारही टोकांना मध्यात उलटवा, पुन्हा बाहेर उलटवा. चार पाय तयार होतील.
आता सगळे उलटे करा. घडीच्या दोन बाजूला पाय आहेत.उरलेल्या दोन बाजूंना मध्यात असे दुमडा की बेडकाचे तोंड तयार होईल.
तोंडाच्या उलट्या बाजूचे टोक पायापर्यंत  उचला आणि त्याला वर घडी घाला.
आता या त्रिकोणात आत पोकळ जागा आहे. त्यात तोंड बनवण्यासाठी घातलेल्या घडीचा भाग या पोकळ भागात आत घाला. दोन्ही कडे हे करा.
आता पुन्हा सगळे उलटे करा. आता मागच्या पायासकट मागचा भाग वर उचला. त्याला असलेल्या सरळ बाजूला बेडकाच्या मध्यावर ठेवा आणि खाली घडी घाला.
आता हे पुन्हा सगळे त्याच्या मध्यात उलते फिरवा, घडी घाला. आता सर्व घड्या थोड्या दाबून घ्या. बेडूक उलटा करून त्याचा पोटाचा भाग वर आणि तोंडा चा भाग खाली असे हलकेच हातात करा. त्याला जरा गोलवा द्या. डोळे रंगवा.
तयार आहे बेदुकामामा. त्याला उद्या मारायला लावण्यासाठी त्याच्या मागच्या भागात जो छोटा त्रिकोण आहे त्यावर बोट ठेवा. बोट त्यावर थोडे दाबून बोट मागे घसरवा. घ्या उद्या मारणारा बेडूकामामा. आता स्पर्धा लावा घरातल्या छोट्यांच्या :)

तीळगुळचा डब्बा

मायबोलीवरच्या एका मैत्रिणीने विचारले  म्हणून त्याचा  हा व्हिडीओ. बालपणीच्या कितीतरी आठवणी पुन्हा जागवणारा हा, तीळगुळचा डब्बा.



हाय !

हाय SSSS :)

इथे आपण छोट्या छोट्या मजेशीर गोष्टी करायला शिकुयात. कधी छोटेसे विणकाम, कधी ओरिगामी, कधी चित्र, नुसती धमाल मस्ती करूयात कस? :)

लहान मोठे सगळे करू शकतील, पटकन होतील अशा गमतीशीर गोष्टी करूयात. करतानाही गंम्मत आणि नंतर खेळताना, बघतानाही गम्मत !

मग येताय ना? चला तर. करू थोडी गंम्मत - जंम्मत; करू थोडे किडुक - मिडुक :)